नगर । अनेकांच्या जीवावर बेतलाय निष्काळजीपणा; आज रुग्णसंख्या वाढीचा ‘ब्लास्ट’

नगर (प्रतिनिधी) – आजवरचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक करत करोना विषाणूने आज नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा अक्षरश: ब्लास्ट घडविला आहे.  आज तब्बल 3 हजार 97 नवे रुग्ण सापडले असून, आता त्यांच्या जगण्यासाठी केवळ ‘देवाक काळजी रे’ अस म्हणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येऊन ठेपली आहे.

दरम्यान, काल (ता. 14) रात्रीपासूनच राज्य सरकारने घोषित केलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तथापि, नगर शहरात लॉकडाऊन किंवा येत्या 1 मे पर्यंतची ही संचारबंदी कुठे आहे? असा सर्वांनाच पडावा, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. बहुतेक भागांत बाहेर फिरणारांना अडविणारे कुणीच रस्त्यावर नव्हते. नेहमीप्रमाणे नगरकरांची धावपळ आजही अगदी बिनदिक्कत सुरु होती. त्यामुळे निर्बंधांची ही अंमलबजावणी केवळ ‘राम’भरोसे ठरली.

त्यातही हा लॉकडाऊन नक्की कुणासाठी? असाही प्रश्‍न पडला. अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावरील दुकाने बंदच होती. त्यामुळे अनेकांनी केवळ घरात ‘बोअर होतय’ म्हणून संचारबंदी कशी असते? हे पाहण्यासाठी रस्त्यांवर बोगस धावपळ केली. तथापि, अशाही महाभागांना अडविणारे कुणीच रस्त्यावर नव्हते. त्यामुळे हा लॉकडाऊन नक्की कुणासाठी आहे? असा कुणालाही प्रश्‍न पडवा, असे चित्र नगरच्या बहुतेक भागांत सर्रासपणे दिसत होते.

कुठेच बेड शिल्लक नाही; आता सर्वच हतबल…!

प्रशासनाने आज घोषित केेलेल्या रुग्णसंख्या वाढीवरुन नगरमध्ये आता तब्बल 17 हजारांपेक्षा जास्त अ‍ॅक्टीव्ह करोनाबाधित आहेत. त्यातील बहुतेकांना आता आरोग्य सुविधांचे बेड मिळणे शक्यच नसल्याची स्थिती आहे.

ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर बेड सोडाच, साधा बेडही कुठेच उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील एकही बेड शिल्लक नसल्याचे आता नवीन रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयाची यंत्रणा देखील हतबल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.