मुंबई – उद्धव ठाकरे यांना पाठिंबा असल्याची अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदेगटाकडून करण्यात आला होता. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. स्टॅम्प पेपरचा वापर करुन शपथपत्र बनवली होती, असा आरोप ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एका व्हिडीओ मेसेजद्वारे केला होता. दरम्यान, आता गुन्हे शाखेच्या तपासातून या शपथपत्रांबाबत खुलासा समोर आला आहे.
चौकशीत ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप यांनी सांगितले आहे. कोपरगावमधील 200 शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग झाल्यानंतर दोन अधिकाऱ्यांचे पथक कोपरगावमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने 200 जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली. मात्र काहीही आक्षेपार्ह आढलेले नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतर कोपगावमध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी बनावट शपथपत्र प्रकरणी दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंतिम अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटातील ‘या’ आमदाराची सुरक्षा वाढवली, शिंदे गटात प्रवेश करणार? https://t.co/L9vwVBOnIP
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी सांगितले की, ही शपथपत्रे आम्ही स्वत : दिली आहेत, हे सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे. पण आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, कोणत्याही दबावतंत्राला आम्ही घाबरत नाही. शिंदे सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी म्हंटले.