पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंर्तगत पहिल्या नियमित प्रवेश फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सोमवारी (दि. 26) सांयकाळी 6 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिली फेरी पूर्ण होताच दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे.
पहिल्या नियमित फेरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दि.24 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान काही विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश फेरीतील प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचा धडाका लावला होता. राज्य शासनाने विद्यार्थी हिताचा विचार करुन नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढही दिली आहे. नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठीचा अर्ज व हमीपत्र सादर करुन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आलेली आहे.