अभिनेत्री लॉरेन गॉटलिबने अलीकडेच आपल्या खासगी आयुष्यातील काही गुपिते, धक्कादायक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. त्या खुलाशामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. रेमो डिसूजाच्या “एबीसीडी 2′ या चित्रपटातून झळकल्यानंतर लॉरेन रूपेरी पडद्यावरुन हळूहळू लांब जात राहिली आणि एक क्षण असा आला की ती पूर्ण गायबच झाली.
तिचा वावर असायचा तो केवळ सोशल मीडियावर. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती. लॉरेन याबाबत सांगते की, हा माझ्या आयुष्यातील खूप कठीण काळ होता. मी आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते, उन्मळून पडले होते. समाजासमोर जाताना मी नेहमीच हसतमुखाने जायचे. मी खूप खुश आहे असं दाखवायचे; पण वास्तव तसे नव्हते. मी खूप दुःखी आणि अस्वस्थ होते.
या अस्वस्थतेमुळेच मी व्यसनांच्या मार्गावर ओढली गेले. अल्कोहोल आणि ड्रग्ज हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून गेले. कालांतराने मी पूर्ण व्यसनाधिन झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी यातून बाहेर पडण्यासाठी रितसर थेरेपी घेतली. लॉस एंजेलिसला गेले. जवळपास 8 महिने मी सर्वांपासून लांब राहिले.
या काळात खूप वाचन केलं. ध्यानधारणा केली. या प्रयत्नांना दोन वर्षांनी यश आले आणि मला जणू पुनर्जन्मच झाल्यासारखे वाटले. त्या काळात मी विमानामध्ये बसून बराच काळ ओक्साबोक्शी रडायचे; पण लोकांसमोर आल्यानंतर सारं काही आलबेल असल्याचा आव आणायचे.
“एबीसीडी-2′ पासूनच मला मागे सारण्याचा सिलसिला सुरू झाला होता. ते सहा महिने म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण आणि दुर्दैवी काळ होता. यामध्ये “झलक दिखला जा’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असतानाच्या काळाचाही समावेश आहे, असं लॉरेन सांगते.