मुंबई – एकेकाळी अभाविप या विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून काम केलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांना भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले आहे. पक्षाने आज रविवारी एका बैठकीत हा निर्णय घेतला. याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. या दोघांनाही पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारली होती.
आतापर्यंत ते भाजपचे राष्ट्रीय सेक्रेटरी म्हणून काम पहात होते. भाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे हे पद रिक्त होते. त्या जागी तावडे यांना नेमले गेले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून तावडे यांच्याकडे पाहिले जात होते. गेले काही दिवस तावडे हे तसे पडद्या आडच गेलेले दिसले. ते पक्षाच्या व्यासपीठावर फारसे सक्रिय दिसले नव्हते. आजच्या या निर्णयामुळे ते पुन्हा भाजपच्या राजकारणात सक्रिय होतील असे मानले जात आहे.
तावडे यांनी विधान परिषदेत दोन वेळा विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले आहे. काही काळ ते मुंबई प्रदेश भाजपचेही अध्यक्ष होते. सन 2014 मध्ये ते पहिल्यांदा बोरीवली मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते 2014 ते 2019 या अवधीत राज्याचे शिक्षण मंत्री होते. 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती.