अहमदाबाद – गुजरातमध्ये एका भ्रष्ट सरकारी अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने गैरमार्गाने कमावलेली तब्बल 2.27 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. गुजरातच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेली ती आतापर्यंतची विक्रमी रोकडजप्ती मानली जात आहे.
भ्रष्ट मार्गाने प्रचंड कमाई करणाऱ्या अभियंत्याचे नाव निपूण चोक्सी असे आहे. तो गांधीनगरमधील समग्र शिक्षण अभियान (एसएसए) कार्यालयात रूजू होता. त्याच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार एका कंत्राटदाराने दाखल केली.
त्यावरून एसीबीच्या पथकाने 16 जुलैला सापळा रचून चोक्सी याला 1.21 लाख रूपयांची लाच स्वीकारताना पकडले. चोक्सीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्याच्या घरातून 4.12 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
त्याच्या दोन बॅंक लॉकर्समध्ये 74.50 लाख आणि 1.52 कोटी रूपयांची रोकड आढळली. त्याशिवाय, एका लॉकरमधून 10 लाख रूपये किमतीचे सोनेही जप्त करण्यात आले. कंत्राटदारांना मिळणाऱ्या रकमेतून चोक्सी एक टक्का कमिशन घेत असल्याची माहिती एसीबीच्या चौकशीतून समोर आली.