पुणे – वीजेचा धक्का बसल्यामुळे २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. फैय्याज जावेद मणियार (वय २४, रा. गोखलेनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. औंधमधील ब्रेमेन चौकातील शौचालयाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
फैय्याज कुटूंबियासोबत गोखलेनगरमध्ये राहत होता. तो खासगी ठिकाणी काम करत होता. आज दुपारच्या सुमारास फैय्याज आणि त्याचा एक मित्र ब्रेमेन चौकातील स्वच्छतागृहाजवळ गेले होते. पावसामुळे त्याठिकाणी पाणी साचले होते. स्वच्छतागृहाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत गेला असता, वायरमध्ये फैय्याजचा हात अडकल्यामुळे त्याला धक्का बसला.
त्यामुळे फैय्याजचा जागीच त्याचा मृत्यू झाला. हा घडलेला सर्व प्रकार त्याच्या मित्राने पोलीसांना दिल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी ब्रेमेन चौकात धाव घेतली. दरम्यान, फैय्याज लघुशंका करण्यासाठी त्याठिकाणी गेला असावा असा अंदाज आहे. मात्र, तो स्वच्छतागृहाच्या पाठीमागे का गेला हे समजू शकलेले नाही. फैय्याज याचा शॉक लागूनच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली .