वडूज, (प्रतिनिधी) – महाशिवरात्रीनिमित्त येथील श्री महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने हेमाडपंथी काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात मंगळवारपासून शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सुरू झाले आहे. यामध्ये शेकडो महिला व पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. महाशिवरात्रीला, शुक्रवारी (दि. 8) बाल कीर्तनकार माउली महाराज काकडे यांचे कीर्तन होणार आहे.
काशी विश्वेशर महादेव मंदिरात सकाळी 11 ते 1 या वेळेत शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण होत आहे. शंकर स्वामी हे व्यासपीठ सांभाळत आहेत. मंदिरात सकाळी 6 वाजता रूद्राभिषेक, दुपारी 4 वाजता सद्गुरू भजनी मंडळाचे भजन आणि रात्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाचा जागर झाला.
उद्या, दि. 6 रोजी दुपारी 4 वाजता माउली भजनी मंडळाचे भजन, रात्री 9 वाजता संत तुकाराम भजनी मंडळाचा जागर, गुरुवार, दि. 7 रोजी दुपारी 4 वाजता ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळाचे भजन, रात्री 9 वाजता दत्त भजनी मंडळाचा जागर, शुक्रवार, दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता श्री विश्वाराध्याय रूद्र मंडळाचे रूद्र पठण, सायंकाळी 7 वाजता महाआरती,
रात्री 9 ते 12.27 पर्यंत संभाजीनगर येथील बाल कीर्तनकार माउली महाराज काकडे यांचे महाशिवरात्रीचे कीर्तन, शनिवार, दि. 9 रोजी दुपारी 12.30 ते रात्री 9 या वेळेत डॉ. संतोष गोडसे व परिवारातर्फे महाप्रसाद देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन महादेव मंदिर ट्रस्ट व सार्वजनिक मंडळांच्यावतीने करण्यात आले आहे.