सासवड – पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेकडे स्वतःच्या मालकीची इमारत असतानाही 88 लाख रुपये खर्च करुन संचालकांनी कार्यालयासाठी 99 वर्षांच्या भाडेतत्वार फ्लॅट खरेदी केला आहे. याला सभासदांनी वार्षिक सभेत विरोध केला. गेल्या वर्षीच्या वार्षिक सभेमध्ये जागा घेण्याचा ठराव आहे. तरीही संचालकांनी भाडेतत्वावर फ्लॅट खरेदी केला आहे. यामुळे झालेला खर्च संचालक मंडळांकडून वसूल करावा, असे सुचवण्यात आले.
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सभा रविवारी (दि. 21) झाली. पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार व मनमानी कारभारास कंटाळून सहा संचालकांनी राजीनामे दिले आहेत. तसेच संस्थेला स्वतःच्या मालकीची तीन मजली इमारत असतानाही 88 लाख रुपये खर्च करुन कार्यालयासाठी फ्लॅट घेतला आहे. यासंदर्भात सहा संचालकांसह 281 सभासद व शिक्षक संघाने जिल्हा व पुरंदर तालुका सहकार निबंधकांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार रविवारच्या वार्षिक सभेमध्ये सभासदांची गंगाजळी तारण ठेवून ठेवीवर कर्ज घेतले व सासवड मार्केटयार्डात भाडेकरारावर कार्यालयासाठी फ्लॅट घेतला. तो देखील बाजारभावापेक्षा जास्त किंमतीने खरेदी केला आहे. मार्केटयार्ड परिसरात यापेक्षा स्वस्त किंमतीत जागा खरेदी उपलब्ध होत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला आहे.
मात्र, फ्लॅट खरेदीसाठी गतवर्षी ठरावच झालेला नाही. त्यामुळे सुमारे 88 लाख रुपये झालेला खर्च मान्य नसल्याचे सांगत संचालक मंडळाने केलेला चुकीचा व्यवहार रद्द करावा, असा ठरावच करण्यात आला व सर्वच उपस्थित सभासदांनी उभे राहून हात उंच करीत ठराव नामंजूर असल्याचे सांगितले. ठरावाचे सूचक अनुमोदकांच्या नावांसह ठराव लेखनाचे व्हिडीओ चित्रीकरण ही सर्वांसमक्ष करण्यात आले.
यावेळी महिला शिक्षक सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच संपूर्ण सभेचे छायाचित्रण पत्रकारांसमक्षही करण्यात आले.