पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पुरंदर तालुक्यातील डोंगराळ भागात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वनक्षेत्रात ऐन उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्याचे दुर्भिक्ष भासू नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पुरंदर तालुक्यातील काही दुर्गम आणि डोंगराळ भागात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करण्यात येत आहे. जिल्ह्यात संकट किंवा आपत्तीवेळी सदैव मदतीसाठी तत्पर असलेले दगडूशेठ गणपती ट्रस्ट अनेक गावोगावी सेवा पुरवत आहेत. ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
वाल्हेसह गायकडवाडी, आंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, राखनजीकची रणनवरेवाडी, चव्हाणवस्ती, पडळकरवस्ती, नावळीनजीकची दौडवस्ती, सोनवणेवस्ती, पिंगोरी, कवडेवाडी, शिंदेनगर, खोमणे वस्तीवरील ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे, तसेच शिल्लक राहिलेले पाणी शेतशिवारातील तळ्यात सोडले जात आहे. त्यामुळे येथील पाळीव आणि वन्यजीवांच्याही पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत, पाणवठे आटले आहेत. त्यामुळे सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. डोंगर परिसरातील वन्यजीव अनेकदा अन्न- पाणी शोधत मानवी वस्तीकडे फिरताना दिसतात. त्यामुळे ट्रस्टने पाण्याची सोय केली आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत पावसाळ्यापासूनच दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. – माणिक चव्हाण, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट