पुणे – दिवाळी हा सर्वांत मोठा सण आहे. सणाच्या निमित्ताने ज्याप्रमाणे पणत्या, आकाशकंदिल, कपडे घेण्याकडे सर्वांचा कल असतो, त्याचप्रमाणे किल्ल्यांची खरेदीकडे बालचमूंचा कल असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची आणि त्यागाची आठवण रहावी, या हेतूने घरासमोर किल्ल्याच्या प्रतिकृती तयार केल्या जात. मात्र, वाडा आणि बैठ्या घरांपेक्षा हल्ली सगळीकडे प्लॅट संस्कृती आहे. यामुळे घरापुढे असणाऱ्या अपुऱ्या जागेमुळे लहानग्यांना किल्ले तयार करण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही. दगड, विटा, माती गोळा करून त्यापासून आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार देण्याकडे चिमुकल्यांचा उत्साह असायचा. पण आता किल्ला तयार करण्याची पद्धत आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. रेडिमेड किल्ला घेऊनच हल्ली त्याची सजावट केली जाते.
दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या किल्ल्यांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परंतु, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांनी घरोघरी रेडिमेड किल्ले आणून किल्ले सजवण्यात येत आहेत. रेडिमेड किल्ल्यांमध्ये लाईटचादेखील समावेश केला जातो.
हे रेडिमेड प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले बाजारामध्ये साधारण 200 ते 1500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 1 ते 3 फुटांपर्यंतच्या किल्ल्यांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.