रेडिमेड दिवाळी फराळाला पसंती

नगर – दसरा झाला की, दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी आली की खरेदी आलीच. दिवाळीसाठी मग बाजारपेठातही गर्दी दिसते. दिवाळी दोन दिवसांवर आली असून खरेदीची लगबग बाजारपेठांमध्ये दिसते. दागिने आणि कपड्यांच्या खरेदी सोबतच महिला ग्राहक दिवाळी फराळ खरेदी करतात. शहरात कोठी रस्ता, कापडबाजार, लक्ष्मीकारंजा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, चितळे रोड याभागात फराळाच्या पदार्थ्यांची विक्री केली जात आहे.

मसाला, लवंग, पालक, भावनगरी, अशा विविध प्रकारातील शेव…. बेसनाचे, मोतीचूरचे लाडू…. पातळ पोहे, खट्टा-मिठा अशा विविध प्रकारातील खमंग चिवडा…. तसेच शंकरपाळे, अनारसे, करंजी, चकली, असे एकसे बढकर एक पदार्थांनी बाजारपेठ सजली आहे. रेडीमेड पदार्थ खरेदी करण्याकडे महिलांचा ओढा वाढला आहे. धावपळीच्या जीवनात घरात दिवाळीचे पदार्थ बनवणे शक्‍य नसणाऱ्यांसाठी बाजारात विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध झाल्या आहेत. काजूकतली, अंजीर बर्फी, मावा पेढा या मिठाई ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत.

बदलत्या काळानुसार दिवाळी फराळ बनवण्यासाठी वेळ नसल्याने अनेकजण फराळ बाजारातून विकत आणणे पसंत करतात. यंदा फराळासाठी आवश्‍यक असणाऱ्या कच्चा मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाली. तसेच रेडिमेड पदार्थांमध्ये देखील 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे, व्यावसायिकांनी सांगितले. चकली, लाडू, अनारसे, चिवडा या पदार्थ्यांच्या किंमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली. असे असली तरी देखील ग्राहकांकडून रेडीमेड फराळ खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आरोग्याबाबत जागरुक असलेल्या महिलावर्गाची तेल, तुप नसलेल्या डाएट फराळाकडे कल आहे. फराळांची खरेदी करताना ऑईल फ्री चिवडा, शुगर फ्री मिठाई, डाएट चिवडा, डाएट चकली, शंकरपाळे, यांना मागणी आहे.

साधी शेव 260रुपये किलो, मसाला शेव 280 रुपये किलो, भाजके पोहे चिवडा 300 रुपये किलो, कच्चे पोहे चिवडा 300 रुपये किलो, बेसन लाडू 260 रुपये किलो, मोतीचूर लाडू 280 रुपये किलो, रवा लाडू 260 रुपये किलो, रवा खवा लाडू 300 रुपये किलो,अनारसे 380 रुपये किलो, चकली 380 रुपये किलो, करंजी 380 रुपये किलो, शंकरपाळे 260 रुपये किलो, सोनपापडी 260 रुपये किलो,बालुशाही 260 रुपये किलो,चुरमावडी 260 रुपये किलो आहेत.

दरवर्षी डाळींचे वाढणारे भाव, जीएसटी, महागडा गॅस, वाढलेल्या तेलाच्या किंमती यामुळे फराळाच्या किंमती वाढल्या आहेत. वाढलेल्या दरामुळे घरगुती फराळ बनवणाऱ्या महिला उद्योजकांना महागाईची झळ सोसावी लागली. फराळाचे दर वाढवले तर ग्राहक तुटतात, या भीतीने केवळ 10 ते 15 टक्के दर वाढवण्यात आलेले आहेत.

नरेंद्र कुलकर्णी, व्यावसायिक  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.