पुणे – कर्णधार फाफ डुप्लेसी, विराट कोहली, महिपाल लोमरोर, रजत पाटीदार व दीनेश कार्तिक यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे रॉयल चॅलेंजर बेंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 174 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकत बेंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. डुप्लेसी व कोहली यांनी थाटात सुरुवात करत 62 धावांची सलामी दिली. डुप्लेसी चांगला खेळत होता मात्र, मोईन अलीच्या गोलंदाजीवर विनाकारण आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 22 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावताना 38 धावांची खेळी केली. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत भरात आलेला कोहलीही चांगलाच स्थिरावला होता. मात्र, त्यालाही मोईन अलीने त्रिफळाबाद केले.
गेल्या दीड वर्षांपासून मोईन अलीच्याच गोलंदाजीवर कोहली सातत्याने बाद होत असून हीच परंपरा या सामन्यातही कायम राहिली. ग्लेन मॅक्सवेल चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. लोमरोरने पाटीदार सह संघाचा डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले. पाटीदारही अनावश्यक फटका मारून 15 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार मारुन 21 धावांवर परतला. महिश तक्शिणाने लोमरोर व वनिंदू हसरंगा यांना पाठोपाठच्या चेंडूंवर बाद केले मात्र, त्याची हॅट्ट्रिक पूर्ण होऊ शकली नाही.
लोमरोर अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला त्याने आपल्या 42 धावांच्या खेळीत 27 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार फटकावले. मात्र, बोद होण्यापूर्वी त्याने संघाला दीडशतकी धावांचा पल्ला पार करुन दिला. शाहबाद अहमद व हर्षल पटेलने साफ निराशा केली. तळात दीनेश कार्तिकने आपला फॉर्म कायम राखत वेगाने धावा जमवल्या. त्याने 17 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 26 धावा करताना संघाला 20 षटकांत 8 बाद 173 अशी भक्कम धावसंख्या उभारुन दिली. चेन्नईकडून महिश तक्शिणाने 3 गडी बाद केले. मोईन अलीने 2 बळी घेतले. ड्वेन प्रीटोरियसने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरु – 20 षटकांत 8 बाद 173 धावा. (महिपाल लोमरोर 42, फाफ डुप्लेसी 38, विराट कोहली 30, रजत पाटीदार 21, दीनेश कार्तिक नाबाद 26, महिश तक्शिणा 3-27, मोईन अली 2-28, ड्वेन प्रीटोरियस 1-42).