मुंबई – एलआयसीचा आयपीओ आजपासून किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होत असतानाच रिझर्व बॅंकेने व्याजदरात वाढ करून भांडवल सुलभता कमी केली असली तरी एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी उपलब्ध शेअरच्या 62 टक्के इतकी मागणी या आयपीओला आली आहे.
एलआयसीच्या पॉलिसी धारकांनी त्यांना उपलब्ध शेअरच्या 1.82 पट अधिक मागणी नोंदविली असल्याचे दिसून येते. 9 मेपर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांना आयपीओमधील शेअरसाठी बोली बोलता येणार आहेत. अगोदरच अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी रुपये उभे केले आहेत. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांनी जेवढे शेअर उपलब्ध होते तेवढया शेअरसाठी मागणी पूर्ण केली आहे.
शनिवारी बोली बोलता येणार
विशेष म्हणजे शनिवारी 7 मे रोजी सुद्धा गुंतवणूकदारांना या आयपीओमधील शेअर साठी बोली लावता येणार आहेत. 17 मे रोजी एलआयसीची शेअर बाजारावर धुमधडाक्यात नोंद होण्याची शक्यता आहे. एलआयसीने आपल्या पॉलिसी धारकांना एसएमएस पाठवून या संदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या आयपीओसाठी बोली आणखी वाढण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबर 1956 रोजी खासगी विमा कंपन्यांचे विलीनीकरण करून त्याचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर एलआयसी निर्माण झाली होती.