पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामुळे उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे.
तर दुसरीकडे, चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपा-कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, अश्यातच कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सगळ्यात आता रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत ‘प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न’ केल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं.
याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचं सांगत तक्रार दाखल केली आहे. तसेच, निवडणूक आयोगाने तातडीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी असं देखील सांगितलं आहे.