अकोला – राज्यात रावण दहनाच्या (Ravan Dahan) प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या (Ncp) अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे. (Ravan Dahan tradition should be banned)
मिटकरींनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाला भेट दिली. या गावात रावण मंदिराच्या (Ravan Mandir) उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील सभागृह बांधकामासाठी दिलेल्या 20 लाखांच्या निधीच्या कामाचे भूमिपूजन केले. सांगोळा गावात 350 वर्ष जुनी रावणाची मूर्ती आहे. या संपूर्ण गाव दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्यात येते.
भूमिपूजनानंतर मिटकरींनी म्हटले की, रावण हे आदिवासींचे दैवत असेल तर रावण दहन कशाला, आदिवासी बांधवांची भावना रावणासोबत असेल तर रावण दहनाला बंदी घातली पाहिजे.
लंकेचा राजा आणि शिवभक्त असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन कशाला? आम्ही रामाची पूजा करतो, पण रावणाचे दहन कशाला असा सवाल त्यांनी केला. रावण दहनावर बंदी घालण्यासाठी आपण विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.