-रत्नागिरीची दहा दिवस, तर कर्नाटकची 20 दिवस होणार आवक
-गेल्या आठवड्याच्या तुलनेत हापूसचे भाव दहा टक्क्यांनी उतरले
पुणे(प्रतिनिधी) : गोड चवीच्या रत्नागिरी हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील 8 ते 10 दिवस रत्नागिरी आणि आणखी वीस कर्नाटक हापूसची चव पुणेकरांना चाखता येणार आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत करोनामुळे यंदा आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात आंब्याचे भाव चढेच आहेत. किरकोळ बाजारात रत्नागिरी हापूसच्या एका डझनाची विक्री 300 ते 400 रुपये तर कर्नाटक हापूसची 200 ते 300 रुपये दराने होत आहे.
हापूसचे व्यापारी बाप्पू भोसले म्हणाले, कोकणातील रत्नागिरी व देवगड भागातून तुरळक प्रमाणात आंबा दाखल होत आहे. रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हळूहळू आंब्याची आवक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या भावात सुमारे दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या बाजारात 5 ते 9 डझनाच्या कच्च्या पेटीस 800 ते 1500 रुपये तर तयार आंब्यास 1000 ते 2000 रुपये भाव मिळत आहे. दरम्यान, करोनामुळे नेहमीच्या तुलनेत यंदा वीस टक्केच आंबा बाजारात आला आहे.
सध्यस्थितीत शहरात दिवसाला कर्नाटक हापूसच्या 800 ते 1500 पेट्यांची आवक होत आहे. एरवी कर्नाटकातून 20 ते 25 गाड्यांमधून आंबा दाखल होतो. मात्र, सध्यस्थितीत दररोज दहा ते पंधरा गाड्यांमधून आंबा शहरात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनामुळे आंब्याची आवक व गिर्हाईकही कमी आहेत. कर्नाटक हापूस मुख्यत्वे आठवडे बाजार, स्टॉलधारक, हातगाडी विक्रेते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र, करोनामुळे सर्व बंद असल्याने आवक घटूनही हापूसच्या भावात घट झाली नाही. तसेच, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीला आवक कमी राहिली. त्यात वारंवार झालेल्या नियमातील बदलांचा फटका आंब्याचा आवकेला बसला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याला अपेक्षित मागणी नसल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
रत्नागिरी हापूस…
कच्चा : (4 ते 8 डझन) 800 ते 1500 रुपये
तयार : (5 ते 8 डझन) 1000 ते 2000 रुपये
कर्नाटक हापूस…
कच्चा (4 ते 5 डझन) : 500 ते 800 रुपये
पायरी (4 ते 5 डझन) : 400 ते 700 रुपये
लालबाग (प्रतिकिलो) : 25 ते 35 रुपये
बदाम (प्रतिकिलो) : 35 ते 45 रुपये
हापूस (प्रतिकिलो) : 40 ते 55 रुपये
मलिका (प्रतिकिलो) : 40 ते 50 रुपये