नवी दिल्ली – वाजतगाजत भारतात दाखल झालेली पाच राफेल विमाने हवाईदलात सामील करून घेण्याचा अधिकृत समारंभ येत्या 10 सप्टेंबरला होणार असून त्या कार्यक्रमाला फ्रांसचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारत आणि फ्रांसचे अधिकारी या दौऱ्याचा तपशील ठरवत आहेत. भारत फ्रांसकडून जी राफेल विमाने घेणार आहे त्यातील पाच विमाने भारतात दाखल झाली असून सध्या ती अंबालाच्या हवाईतळावर ठेवण्यात आली आहेत. ती समारंभपूर्वक भारतीय हवाईदलात दाखल केली जाणार आहेत.
या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत आणि अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांनी होकार दिला आहे.
भारत एकूण 36 राफेल विमाने घेणार असून त्यातील 30 विमाने लढाऊ विमाने असतील तर 6 विमाने प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत.