लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशात तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार उघडकीला आला. लखीमपूर खेरी जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेला अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा आहे.
सदर मुलगी या जिल्ह्यातील सिंगाही गावची राहणारी होती. तिचा मृतदेह एका उसाच्या शेतात सापडला. तिच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा आहेत. टणक वस्तू तिच्या डोक्यात टाकून तिची हत्या करण्यात आली आहे. ही मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. ती शेतात खेळायला गेली असताना तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
आज तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. या मुलीचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कारही झाल्याचे निष्पन्न झाले आहे. लेखराम नावाच्या इसमानेच जुन्या शत्रुत्वातून हा प्रकार केला असल्याची तक्रार सदर मुलीच्या वडिलांनी दिली आहे. आरोपीला पकडण्याचे सर्वंकष प्रयत्न जारी आहेत. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालीही कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे.
याच जिल्ह्यात एका 17 वर्षीय आणि एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्यांच्या हत्या करण्याचे प्रकार अलीकडच्या काळातच घडले आहेत.