जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला गती मिळण्याची गरज

ऐतिहासिक साताऱ्याच्या वैभवाबाबत मोठी चर्चा होते. इथल्या ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेत परिसरातील निसर्गही सर्वांचे आकर्षण आहे. इतिहासापेक्षा वर्तमान काळात काय सुरू आहे, हे लक्षात घेतले तर साताऱ्याला फार उज्ज्वल भवितव्य आहे, असे म्हणावेसे वाटत नाही. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तर साताऱ्याचा एक नवा इतिहास रचला जाऊ शकतो. पर्यटकांना आकर्षित करून स्थानिकांच्या रोजगारवृद्धीत वाढ होऊ शकते. पण हे करणार कोण, या प्रश्‍नाचे उत्तर मिळणे फार कठीण आहे. याउलट शहराचे विद्रूपीकरण व बकालपणा वाढत चालला आहे. परिसरातील निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना झाल्या नाहीत तर साताऱ्याचे वैभवही ऐतिहासिकच ठरेल, यात शंका नाही.

याकडे आताच लक्ष वेधावेसे वाटले कारण साताऱ्यात नवे जिल्हाधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. नव्या दमाने याबाबतच्या उपाययोजना करण्याकडे लक्ष दिलेच तर ते खूपच चांगले ठरणार आहे. जिल्ह्याचे ठिकाण असूनही शहरातील सुविधांची स्थिती सातत्याने दुर्लक्षित आहे. नगरपालिकेच्या कारभारावर ना पदाधिकाऱ्यांचे ना लोकप्रतिनिधींचे नियंत्रण. अशा अवस्थेत शहराच्या नियोजनबद्ध विकासाला एखादा अधिकारीच वेगळी दिशा देऊ शकतो. टी. चंद्रशेखर किंवा तुकाराम मुंढे यांसारखी अधिकाऱ्यांची काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रशासनाच्या काळात काही शहरांचे चेहरे बदलले. साताऱ्यात नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अशी अपेक्षा केली तर ती वावगी ठरू नये.

कारण वेळ निघून जाते आहे, जगाबरोबरची गती शहराला पकडता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्याची आता वेळ आली आहे. शहराचा चेहरा बदलायचा असेल तर अनेक प्रश्‍नांची सोडवणूक तारतम्याने करायला हवी. पर्यटन विकासातूनही इथे खूप काही साध्य होऊ शकते, इतकी क्षमता या परिसराची आहे. परंतु, पर्यटक इथे यावा, यासाठी खूप बदल घडवावे लागतील. सातारा शहर व परिसर. त्यात अजिंक्‍यतारा, सज्जनगड असे गड. ठोसेघर, वजराईसारखे धबधबे, कास पठार, बामणोली अशी कितीतरी ठिकाणे पर्यटकांना आनंद देऊन शकतात. महाबळेश्‍वर, पाचगणी, कोयनाननगर या साऱ्या परिसराला भेट देण्यासाठी सातारा शहर हे मध्यवर्ती केंद्र ठरू शकते. म्हणून सातारा शहर हे सुंदर व सोयींनीयुक्त असले पाहिजे. परंतु सध्याचे चित्र तसे नाही.

ऐतिहासिक शहर आता टपऱ्या आणि खोक्‍यांचे बनले आहे. शहरातील अतिक्रमणे, वाहतूक कोंडी इथपासून रस्त्यांची स्थिती, पाणीपुरवठा अशा सुविधांचा त्रासही लोकांना अनेकदा सहन करावा लागतो. बागा, सांस्कृतिक सभागृहे अशा सुविधांची दूरवस्था आहेच. औद्योगिक वसाहतीला संजीवनी देण्याची गरज आहे. आयटीसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना इथे चांगली संधी मिळू शकते. शहरातील वस्तूसंग्रहालयाच्या इमारतीची परवड सुरू आहे. शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याचीच आवश्‍यकता आहे.

कास, ठोसेघर, सज्जनगड या शहराच्या पश्‍चिमेकडील पर्यटनस्थळांकडे अधिक जाणिवेने लक्ष देण्याची गरज आहे. कासला जागतिक वारसास्थळाचा मान मिळाला आहे. मात्र, तेव्हापासून कास परिसर वेगळ्या अर्थाने “हॉटस्पॉट’ बनू लगला आहे. कास पठाराच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वन विभागाने नियंत्रणासाठी विविध उपाय केले, मात्र, तरीही हेरिटेज म्हणून मिळालेल्या मान्यतेनंतर ज्या तडफेने कासचे नियोजन व्हायला हवे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कास परिसरातील वैशिष्ट्ये टिकून राहतील की नाही, याची साशंकता आहे. हा परिसर म्हणजे खरोखरच एखाद्या नंदनवनासारखा आहे. मात्र, यवतेश्‍वर- कास मार्गावर अनेक अवैध बांधकामे उभी झाली आहेत.

त्याबाबत शासनाच्या वतीने किंवा मंत्री पातळीवरही मोघम चर्चा होते. परंतु ठोस उपाय आखले जात नाहीत. कास परिसराच्या जैवविविधतेला बाधा आणणाऱ्या गोष्टींवर काही नियंत्रण हवे आहे. त्यासाठी काही निकष आवश्‍यक आहेत. हा परिसर केवळ पयर्टन म्हणून नव्हे तर पर्यावरण व पर्यटन याची सांगड घालणारे केंद्र बनायला हवे. नवीन अधिकारी येतात आणि जातात. आता असे काही व्हावे की इथल्या विकासाला योग्य दिशा मिळून जावी. नवनियुक्त जिल्हाधिकारी शेखर सिंह गडचिरोलीतून इथे आले आहेत. पर्यटन विकासाला पूरक जिल्ह्यात ते आले आहेत. या जिल्ह्याच्या विकासाला नेमकी दिशा देण्याचे काम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर ते जिल्ह्याच्या हिताचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.