मुंबई – बॉलिवूड सिनेसृष्टीला अजूनही एक मोठ्या सुपरहिटची प्रतीक्षा आहे. कोरोना गेल्यानंतर सर्व चित्रपटगृह उघडण्यात आली मात्र अद्याप हिंदी चित्रपटाला या वर्षीचा सुपरहिट सिनेमा पडद्यावर झळकवता आलेला नाही. साऊथ चित्रपटांनी मात्र चित्रपट गृहांमध्ये अक्षरशः राज्य केल्याचे दिसून आले. अशात रणबीर कपूरच्या ब्रम्हास्त्रकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
ब्रम्हास्त्र हा चित्रपट बिग बजेट असल्यामुळे याचे प्रमोशन देखील जोरात सुरु आहे. रणबीर कपूर,नागार्जुन आणि एस एस राजामौली यांनी एकत्र जेवण केल्याचे फोटो सध्या जोरदार व्हायरल होताहेत. चेन्नईमध्ये प्रमोशनसाठी गेलेल्या रणबीरने या साऊथ इंडस्ट्रीतील या दिग्गजांसोबत मिटिंग केल्याचे समजते. यावेळी राजामौली यांनी ‘ब्रम्हास्त्र’चे कौतुक केले आहे.
राजामौली यांनी रणबीर कपूरचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, “रणबीर म्हणतो की चेन्नईची संस्कृती इतकी समृद्ध आहे की येथे येणे हा एक मोठा बहुमान आहे. मी त्याला खूप दिवसांपासून ओळखतो, त्याने हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी प्रत्येक दिवस मेहनत घेतली आहे.” ब्रम्हास्त्र ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या अनुषंगाने दिग्दर्शक राजामौली यांच्याशी झालेली ही भेट चित्रपटासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.