सातारा – अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य-दिव्य श्री राम मंदिरात सोमवारी रामलल्लांच्या मूर्तीची (दि. २२) प्रतिष्ठापणा केली जाणार असून या सोहळ्यासाठी अवघी शाहूनगरी सज्ज झाली आहे. सातारा शहरातील विविध मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भगवे ध्वज, टोप्या, ठिकठिकाणी उभारण्यात आलेले शुभेच्छापर फ्लेक्स अन् प्रभू श्री रामांचा जयघोष करणाऱ्या सुमधूर गीतांनी सर्वत्र चैतन्य पसरले आहे.
एक-दोन नव्हे तर पाच शतकांपासूनची प्रतीक्षा आता संपली असून, प्रभू श्रीराम अयोध्या येथील मंदिरात विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तमाम सातारकर अयोध्येच्या दिशेने रवाना झाले असून, ज्यांना या सोहळ्यासाठी जाणे शक्य नाही अशा नागरिकांनी हा सोहळा घरोघरी विविध उपक्रमांनी साजरा करण्याचे नियोजन केले आहे.
हा सोहळा दिमाखात पार पडण्यासाठी साताऱ्याची बाजारपेठ गेल्या आठ दिवसांपासून सज्ज झाली आहे. बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झालेले श्रीरामांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे, भगव्या पताका, खिशावर लावायचे बॅच, टोप्या तसेच पूजेच्या साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे. राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला या साहित्याची सातारकरांकडून भरभरून खरेदी करण्यात आली. या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी लोटल्याने बाजारपेठेला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले.
काळा राम मंदिर येथून भव्य मिरवणूक
सातारा शहरात रामाचा गोट परिसरात प्रसिध्द काळा राम मंदिर आहे . सायंकाळी येथील मंदिरातून श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक मनामती चौक , शनि मंदिर चौक नागाचा पार तेथून भटजी महाराज मठ परिसर तेथून कोल्हटकर आळी मार्गे पुन्हा मिरवणूक गुजर आळीतून राम मंदिराकडे मार्गस्थ झाली . मंदिरामध्ये राम किर्तन, लीलामृत कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते .
शहरातील रस्ते, मुख्य चौकही राममय
प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनाचा सोहळा आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सातारकरांची दोन दिवसांपासून लगबग सुरू आहे. रविवारी दिवसभर मोती चौक, राजवाडा, खणआळी, देवी चौक, प्रतापगंज पेठ आदी ठिकाणी भगव्या पताका व झेंडे लावण्यात आले. काही चौकांमध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेले महाकाय शुभेच्छा फलकही लावण्यात आले. या फलकांनी तमाम सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मंदिरांमध्ये धार्मिक विधी, पूजापाठ, गीतरामायण अशा कार्यक्रमांबरोबरच मिरवणुकांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सातारा शहरात मिरवणुका
सातारा शहरात रविवारी विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून प्रभू श्रीरामांच्या भव्य-दिव्य प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांचा वर्षाव,पारंपारिक वाद्याचा गजर आणि जय श्रीरामच्या जय घोषात काढण्यात आलेल्या या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.