शेवया, सुकामेवा यांची मुस्लीम बांधवांकडून खरेदी
पिंपरी (प्रतिनिधी) – रमजानचा पवित्र महिना अंतिम टप्प्यात आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा मशिदीमध्ये न जाता घरोघरी नमाज पठण करून रमजान ईद साजरी केली जाणार आहे. ईदनिमित्त खास बनविण्यात येणाऱ्या शीरखुरम्यासाठी आवश्यक सुकामेवा आणि शेवया यांची खरेदी करताना आज मुस्लीम बांधव दिसत होते.
रमजानच्या महिन्यात मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर रोजे (उपवास) करतात. हे रोजे रमजान ईदच्या दिवशी सोडले जातात. आपल्याकडे चंद्रदर्शनानंतर सोमवारी (दि. 25) ईद साजरी होण्याची शक्यता आहे. मुस्लीम कॅलेंडरमध्ये चंद्र दर्शनाला महत्त्व आहे. चंद्र दर्शन झाल्यानंतर ईद साजरी केली जाणार आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करण्याचे आवाहन सध्या केले जात आहे. ईदनिमित्त दूध, शेवया आणि सुकामेवा आदींपासून बनविलेल्या शीरखुरमाचे विशेष महत्त्व असते. त्यासाठी आज मुस्लीम बांधवांकडून शेवया आणि सुकामेवा यांची खरेदी केली जात होती. ईदनिमित्त नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी आदींना शीरखुरम्याचा आस्वाद घेण्यासाठी बोलाविले जाते.
मात्र, यंदा करोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अन्य लोकांना घरी न बोलावता कुटुंबीयांसमवेतच शीरखुरम्याचा आस्वाद घेतला जाणार आहे. त्यामुळे शीरखुरमा बनविण्याचे प्रमाण यंदा कमी असणार आहे. ईदसाठी नवीन कपड्यांची आवर्जून खरेदी केली जाते. यंदा काही मुस्लीम बांधवांनी ईदसाठी कपडे न घेता गरिबांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदचे नमाज पठण यंदा ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये होणार नाही. केवळ पाचच व्यक्ती मशिदीमध्ये नमाज पठण करतील. सर्व मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण करावे. याबाबत सर्व मशिदींमधून आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सोशल मीडियावर, प्रत्यक्ष संपर्काद्वारे देखील मेसेज पाठविले आहेत.
– मौलाना फिरोज अझीजी.
शेवयांचे दर वाढले दुपटीने….
ईदनिमित्त बनविण्यात येणाऱ्या शीरखुरम्यासाठी चुंबल, लच्छा शेवई तसेच कच्चा बनारसी, रोस्ट बनारसी आदी प्रकारांतील शेवयांची खरेदी करण्यात आली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेवयांचे दर दुपटीने वाढले आहेत. दोनशे रुपयांपासून चारशे रुपये किलोपर्यंत शेवया उपलब्ध होत्या. त्याशिवाय, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, किसमिस, खारीक, खोबरा, खजूर आदींची देखील विक्री सुरू होती. फरद, पिवळी खजूर, किमिया डेट्स, मेडजोल खजूर आदींना चांगली मागणी होती. 120 रुपये ते 1 हजार रुपये प्रति किलो असे त्यांचे दर होते.