Lal Krishna Advani : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल.
प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे. मुख्य अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे, परंतु 15 जानेवारीपासूनच पूजा आणि विधी यासारखे कार्यक्रम सुरु होतील. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात राम लल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल.
प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. ‘अयोध्येत राम मंदिराच उद्घाटन हे एका दैवी स्वप्नाच्या पूर्ततेसारख आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी नियतीने पंतप्रधान मोदींना निवडलय’ असं लालकृष्ण आडवाणी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘एकदिवस अयोध्येत श्री रामांच भव्य मंदिर उभ राहणार हे नियतीने ठरवलं होतं. आता फक्त हा वेळेचा विषय आहे, प्राण प्रतिष्ठेचा सोहळा होईल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक नागरिकाच प्रतिनिधीत्व करतील. या मंदिरापासून सर्व देशवासियांनी प्रभू श्रीरामांचे गुण घेण्याची प्रेरणा मिळो, अशी मी प्रार्थना आडवाणी यांनी यावेळी केली.
दरम्यान, एकाकाळ असा होता, जेव्हा लालकृष्ण आडवाणी राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा होते. त्यांनी स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केलं. देशात भाजपाचा प्रचार, त्यात लालकृष्ण आडवाणींच योगदान महत्त्वाच होतं. पण वाढत वय आणि बदलेली वेळ यामुळे लालकृष्ण आडवाणी हे नाव कुठेतरी मागे पडलय. राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण आडवाणींच योगदान विसरता येणार नाही.