Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे नवीन रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आजपासून (मंगळवार) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक आणि इतर राज्यांतील अभ्यागत, अयोध्येतील मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी काल रात्रीपासूनच मंदिर मार्गावर भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
काल मुख्य कार्यक्रम संपल्यानंतरच आम्हाला दर्शनाची संधी द्यावी अशी मागणी भाविकांनी केली होती. परंतु त्यांना मंगळावारपर्यंत थांबण्याची सुचना करण्यात आली होती. त्यानुसार आज मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
मंदिराच्या उद्घाटनामुळे काल अयोध्येत कडेकोट बंदोबस्त असल्याने भाविकांना या शहरात प्रवेश करणे अवघड बनले होते. त्यामुळे अनेक जण अयोध्ये शेजारीच थांबले होते. पण आज सकाळी मंदिराचे दरवाजे सर्व सामान्यांनाठी खुले करण्यात आल्याचे समजल्याने भाविकांनी अयोध्येत गर्दी करायला सुरूवात केली आहे.
मंदिर उघडण्याची आणि बंदची वेळ काय असेल?
राम मंदिर सकाळी 7 ते 11:30 पर्यंत भाविकांसाठी खुले असेल. यानंतर प्रभूची मध्यान्ह आरती होईल. दुपारी सुमारे अडीच तास मंदिर विश्रांतीसाठी बंद राहणार आहे. दुपारी 2 वाजता पुन्हा मंदिराचे दरवाजे उघडतील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रामलल्लाचे दर्शन होईल. मात्र, ट्रस्ट दर्शनाची वेळ वाढविण्याच्या विचारात आहे.