राजगुरुनगर -राजगुरुनगर नगर परिषद हद्दीतील सर्व क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस (दि. 16 ते 18) बफर झोन मधील अत्यावश्यक सेवा (सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत) वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
राक्षेवाडीत करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यावर शनिवार (दि. 16) पासून राक्षेवाडीसह लगत असलेले राजगुरूनगर नगरपरिषदचे दोन वॉर्ड कंटेन्मेंट (संक्रमणशील) तर राजगुरुनगर शहर बफर झोन करण्यात आला आहे. याबाबत प्रांतकार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, तहसीलदार सुचित्रा आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते.
प्रांताधिकारी तेली यांनी सांगितले की, राक्षेवाडीत एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 11 व्यक्ती हायरिस्क असुन त्यांतील 5 जण जहांगीर तर 6 जण औंध रुग्णालयात दाखल केले आहेत. बाधित व्यक्तीची पत्नी, त्यांची दोन व भावाचा एक अशी तीन लहान मुले, भाऊ, भावजय, आई, वडील, केस कटिंगवाला व डॉक्टर यांचा समावेश आहे. कंटेन्मेंट भागात नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. येथे कोणत्याही दुकानांना उघडण्यास मनाई आहे. फक्त होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या परिसरातील तीन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
संक्रमणशील क्षेत्रात येणारा भाग
संपूर्ण राक्षेवाडी हद्द, राजगुरुनगर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 2 चा दक्षिण भाग, प्रभाग क्रमांक 3चा उत्तर भाग, एसटी स्टॅन्डमधून राक्षेवाडीकडे जाणारा भाग, पाबळ रोडवरील राक्षेवाडीकडे जाणारा भाग, राक्षेवाडी गणपती मंदिर, भांबुरवाडीच्या बाजूने राक्षेवाडी कडे जाणारा रस्ता, राक्षेवाडी, भांबुरवाडी ओढ्याकडे रस्त्यापर्यंतचा सांडभोरवाडी कडील भाग,रोकडे वस्ती कडे जाणारा रस्ता.
बफर झोनमध्ये येणारा भाग राजगुरूनगर नगर परिषद संपूर्ण हद्द (कंटेनमेन्ट झोन वगळून), सातकरस्थळ पश्चिम, उत्तरेस तिन्हेवाडी (वाळुंजस्थळ), दक्षिणेकडील भीमानदी पर्यंत.
राक्षेवाडी परिसरात करोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वतःची काळजी घ्यावी. घरातून तातडीचे कारण असेल तरच बाहेर पडावे. सोशल डिस्टन्स व मास्क लावावा. हात स्वच्छ धुवावेत, शासनाने निर्धारित केलेल्या नियम अटी यांचे पालन करावे.
-दिलीप मोहिते, आमदार खेड