Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या निवडणुकांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. 15 राज्यातील राज्यसभेच्या 56 जागा रिक्त होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारींची नवे जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. तर राजस्थानमधून सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
The Congress President Shri @Kharge has approved the candidature of the following persons as Congress candidates to contest the biennial elections to the Council of States from the states mentioned against their names. pic.twitter.com/fduRiKMsxW
— Congress (@INCIndia) February 14, 2024
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (3), बिहार (6), छत्तीसगड (1), गुजरात (4), हरियाणा (1), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (4), मध्य प्रदेश (5), महाराष्ट्र (6), तेलंगणा (3), उत्तर प्रदेश (10), उत्तराखंड (1), पश्चिम बंगाल (5) ओडिशा (3) आणि राजस्थान (3) या 16 राज्यांमधील 56 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत हांडोरेचा पराभव
2022 मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता काँग्रेसने चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे. यावरून भाजप आणि मित्रपक्षांकडून महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.