शिमला Rajya Sabha Election 2024 – हिमाचल प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसला राज्यसभा निवडणुकीने जोर का झटका दिला. एकमेव जागेसाठीच्या त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या विजयामुळे त्या राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
हिमाचल विधानसभेचे एकूण संख्याबळ ६८ आहे. कॉंग्रेसचे ४०, तर भाजपचे २५ आमदार आहेत. उर्वरित ३ अपक्ष आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. केवळ आमदारांना मतदानाचा अधिकार असणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय निश्चित मानला जात होता. पण, भाजपने उमेदवार दिल्याने निवडणुकीला रंगतदार स्वरूप प्राप्त झाले. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३४ मतं मिळाली.
त्यानंतर ड्रॉच्या माध्यमातून महाजन यांना विजयी घोषित करण्यात आले. भाजपची सरशी झाल्याने सरकारला पाठिंबा असणाऱ्या ९ आमदारांनी कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले. कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करणारे आमदार भाजपच्या बाजूने कायम राहिल्यास हिमाचल सरकार अस्थिर होऊ शकते.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू यांनी सनसनाटी दावा केला. कॉंग्रेसच्या ५ ते ६ आमदारांचे अपहरण करण्यात आले. ती कृती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी आणि हरियाणा पोलिसांनी केली, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपचा उत्साह दुणावला आहे. आता तो पक्ष हिमाचलमधील कॉंग्रेस सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास ठराव मांडेल, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे.