नवी दिल्ली – राज्यसभेच्या 7 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या 7 रिक्त जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी राजीनामे दिल्याने अथवा काही सदस्यांचा मृत्यू झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काही सदस्यांचा कार्यकाळही संपला आहे.
तामिळनाडूमध्ये 2, पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र. पुद्दुचेरी आणि मध्यप्रदेशात प्रत्येक एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मध्यप्रदेशातील जागा रिक्त झाली होती. तर तामिळनाडूमधील अद्रमुकचे सदस्य के.पी.मुनूसामी आणि आर. वथिलिंगम हे विधानसत्रेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंगेसचे नेते आणि राज्यातील मंत्री मानस रंजन भुनिया यांनीही राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजनामा दिला होता. आसाममध्येही विधानसभेतील सभापती बिस्वजीत दायमरी यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाबरोबर पक्षाचाही राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. पुद्दुचेरीतील सदस्याचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे. या सर्व जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे,