मुंबई – भारताच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाचा अष्टपैलू खेळाडू व महाराष्ट्राचा स्टार क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याने वय चोरी केल्याचा आरोप क्रीडा व युवक विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे. जर यात हंगरगेकर दोषी आढळला तर बीसीसीआय त्याच्यावर बंदी लावू शकते.
वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या युवा संघाने विजेतेपद पटकावले होते. या संघाचा एक प्रमुख खेळाडू असलेल्या राजवर्धनने आपले खरे वय लपवले असल्याची तक्रार बकोरिया यांनी केली असून त्याबाबतचे सर्व पुरावेही सादर केले आहेत. राजवर्धनचे खरे वय 21 असूनही त्याने ते 19 पेक्षा कमी दाखवले. याबात बकोरिया यांनी बीसीसीआयला पत्र लिहिले असून त्यात हे आरोप केले आहेत.
धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन जन्मतारखेची कागदपत्रे सादर केली असून तो धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची हंगरगेकरची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. मात्र, आठवीच्या वर्गात नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी राज्यवर्धनची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 केली. म्हणजेच 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवेळी त्याचे वय 21 वर्षे होते, असेही गुप्ता यांनी म्हटल्याचे बकोरिया यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
कारवाई व आयपीएलही हातातून जाणार
बीसीसीआय या सर्व प्रकरणाचा तपास करणार असून दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. तसेच त्याचा आयपीएल करारही रद्द केला जाऊ शकतो. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या मोसमातील लिलावात राजवर्धनला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना खरेदी केले होते.