नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या सोमवारी ब्रिटनच्या तीन दिवसीय भेटीवर जाणार आहेत. गेल्या २२ वर्षांतील भारतीय संरक्षणमंत्र्यांची ही पहिलीच ब्रिटन भेट आहे. यापूर्वी २२ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस लंडनच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दृष्टीने हा दौरा विशेष मानला जात आहे.
या काळात संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी होण्याची शक्यता आहे. या तीन दिवसीय भेटीदरञान ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांच्याशी राजनाथ यांची विस्तृत चर्चा होणार आहे. या बैठकीत लष्करी सहकार्य आणि संरक्षण औद्योगिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
लंडनस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज थिंक टँकमधील दक्षिण आशियाचे वरिष्ठ फेलो राहुल रॉय-चौधरी म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा ब्रिटन दौरा अनेक अर्थांनी खास आहे.
त्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील संबंध दृढ होतील. ऋषी सुनक हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जी२० परिषदेसाठी भारतात आले होते. राजनाथ सिंह ब्रिटनच्या भेटीत शस्त्रास्त्र निर्मितीच्या एका ठिकाणाला भेट देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.