तेलुगू “हिट’ गेल्यावर्षी रिलीज झाला होता. त्यामध्ये विश्वाक या तेलुगू अभिनेत्याने लीड रोल केला होता. आता त्या “हिट’चा हिंदी रिमेक बनवला जातो आहे आणि यामध्ये राजकुमार राव लीड रोल साकारणार आहे. शलेश कोलानू यांनी तेलुगू “हिट’चे डायरेक्शन केले होते आणि आता हिंदीतील “हिट”चे डायरेक्शनदेखील तेच करणार आहेत.
आता या हिंदी “हिट’चे काम सुरू झाले आहे हे टी सिरीजच्या ऑफिशियल अकाऊंटवर जाहीर करण्यात आले आहे. “होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम’ अर्थात हत्येचा तपास करणाऱ्या एका पोलीस पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती या सिनेमाची कथा गुंफली गेली आहे.
बेपत्ता झालेल्या एका महिलेच्या सुटकेसाठी हा पोलीस अधिकारी किती खटपट करतो हे यामध्ये बघायला मिळणार आहे. या शोधादरम्यान या पोलीस अधिकाऱ्याला पॅनिक अटॅक देखील येऊन जातो. अशा पोलीस अधिकाऱ्याचा रोल राजकुमार राव प्रथमच करतो आहे. यामध्ये राजकुमार रावबरोबर सान्या मल्होत्राही दिसणार आहे. हे दोघेही यापूर्वी “ल्युडो’मध्ये एकत्र दिसले होते. मात्र, “हिट’मध्ये हे दोघेजण खऱ्या अर्थाने स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.