आळेफाटा, (वार्ताहर) – आळे (ता. जुन्नर) गावातील संतवाडी वन विभागात गुरुवारी (दि. 2) रात्री आठच्या सुमारास लागलेल्या आगीत वनसंपदेचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
या आगीमध्ये अनेक वृक्ष, औषधी वनस्पती, गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. या आगीने रौद्र रुप धारण केल्याने वनविभागाला ही आग आटोक्यात आणण्यास दोन ते अडीच तास कसरत घ्यावी लागली. वनविभागाने नवीन असणारी आधुनिक सुविधा म्हणजे फायर ब्लोअर मशीनद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
या आगीची माहिती वनविभागाला नवनाथ वाळुंज यांनी फोनद्वारे दिल्यानंतर वनविभागाची असणारी संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी हजर झाली; परंतु आगेचे स्वरूप आणि वाहणारा वारा याचे गणित घालण्यात वनविभागाला फार वेळ लागला.
या आगीबाबत वन विभागाचे वनक्षेत्रपाल व्ही. एम. काकडे यांच्या समवेत संपर्क साधला असता आगीचे नक्की कारण समजू शकले नाही त्यामुळे अज्ञात व्यक्ती विरुद्ध प्रथम गुन्हा वनविभागाच्या अंतर्गत नोंदविण्यात आल्याची माहिती दिली.