पुणे – “राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी ऍमेनिटीच्या कोणत्या जागा बळकावल्या, किती इमले बांधले तुम्ही दाखवाच,’ असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
“शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अनेक जागा गेल्या काही वर्षांत बळकावल्या,’ असे सांगत येत्या दोन दिवसांत या संदर्भातील यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे पाटील यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केले होते. त्याला जगताप यांनी उत्तर दिले आहे. तसेच ही यादी जाहीर कराच असे आव्हान दिले आहे.
“ऍमेनिटी स्पेसचा चुकीचा वापर करण्याचा घाट भाजपने घातला आहे. विशेष म्हणजे 185 ऍमेनिटी स्पेसमधील तब्बल 74 जागा या एकट्या कोथरूड मतदासंघात आहेत. या जागांचे पाटील नेमके काय करणार आहेत. या जागा ते कोणाला देण्याचा घाट घालत आहेत,’ असा सवाल जगताप यांनी विचारला आहे.
“ऍमेनिटी स्पेसच्या बळकावलेल्या जागा सांगताना गेल्या चार वर्षांत केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पुणेकरांना द्यावी. थकित देयक अर्थात “डिफर्ट पेमेंट’ पद्धतीत राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्याने पुणेकरांचे तब्बल शंभर कोटी, तर समान पाणीपुरवठा योजनेत किमान एक हजार कोटी रुपये वाचले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने तत्परता दाखवली नसती, तर हे पैसे कोणाच्या घशात जाणार होते? याचा विचार पाटील यांनी करावा. महापलिकेकडे 2,200 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पैसे नाहीत, अशी खोटी माहिती पाटील यांनी सांगू नये. यातील एक हजार कोटी रुपये वापरले तरी ऍमिनिटी स्पेस वाचतील,’ असे जगताप म्हणाले.
स्मार्ट सिटी भुलभुलैय्या होता का?
केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्यात हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी हा एक भुलभुलैय्या होता का, असा सवालही जगताप यांनी उपस्थित केला आहे.