कोल्हापूर – राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार या चर्चेला उत आला आहे. जसा युतीचा तिढा आज अखेर सुटला नाही तसाच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचा फैसला अद्याप झालेला नाही. परंतु सर्वच पक्षांनी उत्तरमधून लढण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यातील सत्तारूढ शिवसेना-भाजप युतीचा जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिणामी दोन्ही पक्षाचे नेते एका बाजूला युती होणारच असल्याची ग्वाही देत असतानाच दुसऱ्या बाजूला स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. राज्य सरकारमधील दोन नंबरचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आता विधानसभा लढवायचा निर्णय पक्का केला असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
सध्या शिवसेनेकडे असलेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पाटील यांच्या दृष्टीने अत्यंत सेफ समजला जातो. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी यंदा आपण हॅट्रिक करू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरीकडे विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे तगडा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती आहे. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर उत्तरसह चंदगड आणि राधानगरी भुदरगड या मतदारसंघांचा विचारसुद्धा करत असल्याचे चर्चेला उधाण आला आहे.
चंद्रकांत पाटील ज्या संभाव्य जागेवरून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्या जागा शिवसेनेकडे आहेत. मात्र आता त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेसह भाजप आणि विरोधी पक्षातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची घालमेल वाढली आहे. त्यामुळे आता युती होते की नाही आणि उमेदवारी कोणाला मिळते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.