वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वधर्मसमभाव जोपासून वाघोलीतील विविध मंदिरे, प्रार्थनास्थळे, तसेच नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीतून लाखमोलाची मदत केली आहे.
राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, चिराग सातव पाटील, पूजा मयुर अडसरे या कुटुंबियांच्या वतीने परिसरातील भैरवनाथ देवस्थान मंदिरासाठी 11 लाख रुपयांचा सोन्याचा कळस, वाघोली येथे नव्याने होणाऱ्या जैन स्मारकासाठी 51 हजार रुपयांची देणगी, गुलमोहर सिटीमधील नागरिकांच्या मागणीनुसार 51 हजार रुपये किमतीची गणेश मूर्ती दिली असून, वाघोली आव्हाळवाडी चर्चसाठी 51 हजार रुपयांची देणगी, माहेर संस्था आव्हाळवाडी शाखेसाठी 25 हजार किमतीचे धान्य वाटप, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून दोन हजार किलो गहू व तांदूळ भेट देण्यात आले.
याबरोबरच वाघोली येथील मारुती मंदिर नवीन दीपमाळेसाठी 51 हजार रुपये, जय हनुमान तरुण मंडळाच्या नवीन गणपती मंदिरासाठी 51 हजार रुपयाची मार्बल फरशी, जय हनुमान तरुण मंडळ डोमखेल नवीन मंदिरांसाठी 51 हजार रुपयांचे मार्बल भेट दिले. वाघेश्वर मंदिर येथील नवीन सोन्याच्या कळसासाठी 55 हजार 555 रुपये दिले असून, केसनंद रस्त्याला लागून असलेल्या बालाजीनगर येथे होणाऱ्या नवीन मंदिरासाठी 51 हजार रुपयांची गणेश मूर्ती दिली आहे. सातव कुटुंबीयांनी यापूर्वीही कोविड-19 च्या वाढता प्रादुर्भावच्या काळात भाजीपाला व इतर धान्य स्वरूपात मोफत 15 लाख रुपये साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.