#IPL2021 #SRHvRR : राजस्थानचे हैदराबादपुढे 165 धावांचे आव्हान

सॅमसनच्या खेळीने राजस्थानचे वर्चस्व

दुबई – कर्णधार संजू सॅमसन याच्या अफलातून 82 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 5 गडी गमावून 164 धावा केल्या. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील या सामन्यात आता हैदराबादला प्रतिष्ठा जपण्यासाठी विजय आवश्‍यक आहे. तसेही या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, हा सामना जिंकला तर राजस्थानला प्ले ऑफ गटात स्थान मिळवण्याची संधी कायम राहणार आहे.

नाणेफेक जिंकत सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पहिला झटका डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बसला. सलामीवीर इव्हान लेवीस 6 धावांवर परतला. त्यानंतर मात्र सॅमसनने यशस्वी जयस्वालच्या साथीत संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. जयस्वालही स्थिरावल्यावर अनावश्‍यक फटका मारून बाद झाला.

त्याने 23 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना 36 धावांची खेळी केली. यंदाच्या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने निराशा केली. त्यानंतर मात्र महिपाल लोमरोरने सॅमसनला सुरेख साथ देत संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. दरम्यान, सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी करत वर्चस्व राखले.

सॅमसन शतकी खेळी करेल असे वाटत असतानाच बाद झाला. सॅमसनही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 82 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 57 चेंडूत 7 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. लोमरोरही 28 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार मारून 29 धावांवर परतला. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (संजू सॅमसन 82, यशस्वी जयस्वाल 36, महिपाल लोमरोर 29, सिद्धार्थ कौल 2-36).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.