दुबई (दि. 26) – हर्षल पटेलने घेतलेली हॅट्ट्रिक आणि अन्य गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला. या विजयामुळे बेंगळुरूच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळवण्याच्या आशा कायम राहिल्या असून, यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील लढतीत पराभूत झाल्यामुळे मुंबईच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
बेंगळुरूने दिलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व क्वांटन डीकॉक यांनी धडाक्यात प्रारंभ केला होता. या जोडीने मुंबईला 57 धावांची सलामी दिली. मात्र, हे दोघे आत्मघातकी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाले आणि मुंबईची घसरगुंडी उडाली. रोहितने 28 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावत 43 धावा, तर डीकॉकने 23 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. त्यानंतर मात्र बेंगळुरूच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले.
मुंबईविरुद्ध सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने कारकिर्दीतील सर्वांत देदीप्यमान कामगिरी करताना या सामन्यात हॅट्ट्रिक साकारली. त्याने डावातील 16 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याला, दुसऱ्या चेंडूवर कॅरॉन पोलार्डला, तर तिसऱ्या चेंडूवर राहुल चहरला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर मुंबईच्या उर्वरित फलंदाजांनीही साफ निराशा केली. त्यांचा डाव अखेर 19 व्या षटकात 111 धावांवर संपुष्टात आला व बेंगळुरूने हा सामना 54 धावांनी जिंकला. बेंगळुरूकडून हर्षल पटेलने 4, यजुवेंद्र चहलने 3 गडी बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने 2, तर महंमद सिराजने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी,कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे
आव्हान ठेवले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने निराशा केली. त्यानंतर श्रीकर भरतने कर्णधार कोहलीला सुरेख साथ देत संघाचा डाव सावरला. भरतही स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला. त्याने 24 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावताना 32 धावांची खेळी केली.
त्यानंतर आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने कोहलीला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. दरम्यान, कोहलीने अफलातून अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवताना तो बाद झाला. त्याने 42 चंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51धावांची खेळी केली. मॅक्सवेलने संघाला दीडशतकी पल्ला पार करून दिला. मॅक्सवेलनेही अर्धशतकी टप्पा गाठला.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 165 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 56, विराट कोहली 51, श्रीकर भरत 32, एबी डीविलियर्स 11, जसप्रीत बुमराह 3-36). मुंबई इंडियन्स – 18.1 षटकांत सर्वबाद 111 धावा. (रोहित शर्मा 43, क्वांटन डीकॉक 24, हर्षल पटेल 4-17, यजुवेंद्र चहल 3-11, ग्लेन मॅक्सवेल 2-23, महंमद सिराज 1-15).