Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) 112 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 200 पैकी 199 जागांसाठी आज मतमोजणीला होत आहेत. या निवडणुकीत भाजपने अनेक केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि खासदारांना मैदानात उतरवून मोठी खेळी खेळल्याचे दिसून येत आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 7 खासदारांना तिकीट दिले आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, राजकुमारी दिया कुमारी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड झोंटवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीच्या 8 फेऱ्यांनंतर काँग्रेसचे अभिषेक चौधरी 4119 मतांनी आघाडीवर आहेत. नरेंद्र कुमार हे मांडवा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीच्या 8 फेऱ्यांनंतर काँग्रेसच्या रिटा चौधरी 7335 मतांनी आघाडीवर आहेत.
राजकुमारी दिया कुमारी जयपूरच्या विद्याधरनगर जागेवरही आघाडीवर असून त्यांना ३०२५७ मतांची आघाडी मिळाली आहे. विद्यमान आमदाराचे तिकीट रद्द करून भाजपने खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. तर या जागेवर काँग्रेसने सीताराम अग्रवाल यांना संधी दिली आहे. त्याचबरोबर झालरापाटन मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे 36,211 मतांनी आघाडीवर आहेत.
जालोर जिल्ह्यातील सांचोर विधानसभा मतदारसंघातून भाजपने आपले खासदार देवजी पटेल यांनाही उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुखराम बिश्नोई रिंगणात आहेत. मतमोजणीच्या 6 फेऱ्यांनंतर देवजी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी भाजप खासदार भगीरथ चौधरी अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अलवर जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघातून भाजपने खासदार बाबा बालकनाथ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने इम्रान खान यांना उमेदवारी दिली असून मतमोजणीच्या 6 फेऱ्यांनंतर बालकनाथ 21,324 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी, राजस्थानच्या सवाई माधोपूर जागेवर भाजपने खासदार किरोडीलाल मीना यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार दानिश अबरार आव्हान देत आहेत. मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर किरोडी 2249 मतांनी आघाडीवर आहे.
राजस्थानमधील इतर पक्षांमध्ये अपक्ष 7, भारतीय आदिवासी पक्ष 3, बहुजन समाज पक्ष 3, माकप दोन आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहेत. राज्यातील 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.