Rajasthan Election –विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपने (Bjp) काही राज्यांमधील उमेदवार जाहीर केले. त्या पक्षाने राजस्थानमधील (Rajasthan Election) 41 उमेदवारांची यादी जारी केली. त्या उमेदवारांमध्ये 7 खासदारांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशात भाजपने याआधी काही उमेदवार निश्चित केले. त्या राज्यात 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तोच कित्ता भाजपने राजस्थानातही गिरवला.
त्यामुळे राजस्थानमधील राज्यसभेचा 1 आणि लोकसभेतील 6 खासदार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावतील. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि निवृत्त लष्करी अधिकारी राज्यवर्धनसिंह राठोड यांचाही समावेश आहे.
भाजपने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवार दिलेल्या इतर 40 जागांवर सध्या कॉंग्रेस आणि इतर पक्षांचे आमदार आहेत.
त्यामुळे मागील वेळी गमवाव्या लागलेल्या जागांवर भाजपने अधिक ताकद लावल्याचे स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत.
त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 23 नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानात प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच थेट लढत अपेक्षित आहे.