काठमांडू – हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यांमध्ये (Attack) नेपाळचे (Nepal) 10 विद्यार्थी ठार झाले असून इतर चौघे जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली.
गाझा पट्टीजवळील किबुत्झ अल्युमिम येथील शेतात काम करणाऱ्या 17 नेपाळी नागरिकांपैकी दोन जण सुखरूप बचावले, चार जखमी झाले आणि एक अद्याप बेपत्ता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
रॉकेट हल्ला झालेल्या ठिकाणाहून दहा नेपाळी नागरिकांच्या दुःखद मृत्यूची माहिती मिळाली आहे, असे जेरुसलेममधील नेपाळच्या दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासच्या हल्ल्यात ठार झालेले सर्व 10 लोक पश्चिम नेपाळमधील सुदूर पश्चिम विद्यापीठातील कृषी शाखेचे विद्यार्थी होते.
इस्रायलमध्ये सध्या 4,500 नेपाळी नागरिक काळजीवाहू सेवादाते म्हणून काम करत आहेत. इस्रायल सरकारच्या ‘शिका आणि कमवा’ कार्यक्रमांतर्गत एकूण 265 नेपाळी विद्यार्थी इस्रायलमध्ये शिकत आहेत.
त्यापैकी 119 कृषी व वनशास्त्र विद्यापीठातील, 97 त्रिभुवन विद्यापीठातील आणि 49 सुदूर पश्चिम विद्यापीठातील आहेत. हे सर्वजण कृषी शाखेचे पदवीधर विद्यार्थी आहेत. असेही या निवेदनात म्हटले आहे.
ठार झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवली जात असून बेपत्ता असलेल्या एका विद्यार्थ्याचा शोध घेतला जात असल्याचेही नेपाळच्या दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले गेले आहे.