शिवसेनेत इतकी हतबलता का? : राज यांचा सवाल

पुणे : पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते हि हतबलता. असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली. प्रबळ विरोधी पक्ष नाही, त्यामुळे मनाला वाटेल ते निर्णय घेतात. त्याने राज्याची, देशाची अधोगती होते. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सव्वाशे वर्ष मराठेशाहीने ह्या संपूर्ण भूप्रदेशावर राज्य केलं होतं पण आपला इतिहास पोहचवला जात नाही. त्या वैभवशाली इतिहासाचा प्रचार-प्रसार सरकारने करायचा असतो. पण हे सरकार पुतळ्यांची स्मारकं करण्याच्या घोषणेत मश्गुल आहे. आमचा अटकेपार झेंडे लावल्याचा इतिहास शिकवला जात नाही, असे ते मफहणाले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची राज यांनी खिल्ली उडवली. पुणेकर नवे ठेवायला भारी. चंपा… असे म्हणताच सभेत एकच हशा उसळला.

अमोल यादव नावाच्या एका तरुणाने विमान बनवलं. नंतर त्याने ते मुख्यमंत्र्यांना दाखवलं. त्याला आश्वासन दिलं गेलं कि ‘ठाण्यात जमीन उपलब्ध करून देतो.’ वास्तवात जमीन दिली नाही. अखेर तो मुलगा सरकारी दिरंगाईला कंटाळून अमेरिकेत गेला. हेच तुमचं ‘मेक इन महाराष्ट्र’? असा सवालही त्यांनी केला.

ज्या वेगात नोकऱ्या जात आहेत, ते पाहता प्रत्येक तरुणाच्या मनात एक धाकधूक आहे कि, ‘माझी नोकरी कधीही जाऊ शकते’. ह्याचं कारण सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आलेली भीषण आर्थिक मंदी आहे. हि मंदी नोटबंदी आणि जीएसटी या दोन निर्णयामुळे आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो. त्यामुळे सरकारला जाब विचारणाऱ्या आवरोधी पक्षाची आज सर्वात अधिक गरज आहे, असे ते म्हणाले.

सरकारने घोषणा केली होती कि ‘१०० स्मार्टसिटी घडवणार’. काय झालं त्या योजनेचं? शहरात भरलेलं पाणी म्हणजे स्मार्ट सिटी का? कि वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी? पुण्यातल्या पावसाने आठ हजार वाहने वाहून गेली. हा या शहराचा विकास का असा सवाल त्यांनी केला.

ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले तेच आज भाजपात गेले आहेत. काँग्रेसचा विरोधी पक्षनेताही भाजपात गेला. म्हणजे इथूनही तेच राज्य करणार तिथूनही तेच राज्य करणार. ही तुमच्याशी प्रतारणा नाही का? असा सवाल करत माझ्या तगड्या साथीदारांना ताकद द्या अशी साद त्यांनी घातली.

आम्हाला विरोधासाठी विरोध करणारा ‘विरोधी पक्ष’ व्हायचं नाही. सरकारने एखादं चांगलं काम केलं तर खुल्या मनाने अभिनंदन करू पण जनतेवर अन्याय करायचा प्रयत्न झाला तर निडरपणाने सरकारला धारेवर धरू, असेही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.