नवी दिल्ली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत घेण्याच्या घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील हजर होते. (Raj Thackeray ,Amit Shah meet in Delhi)
या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत.
त्यांच्या या भेटीबाबत सर्व माहिती येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे हे आमचे कर्तव्य असून यापुढेही त्यांच्या आदेशाचे पालन करू.
नांदगावकरांना शिर्डीतून उमेदवारी?
मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या ३ पैकी किमान २ लोकसभा मतदारसंघांची मागणी केली. या तिन्ही जागा शिंदेसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संमतीही घेण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी आहे. शिंदेसेना नाशिक सोडणार नाही. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होऊ शकते. यावर दिल्लीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.