पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरून दोन दिवस शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यात होणारी त्यांची सभा रद्द होणार की लांबणीवर पडणार, याबाबत तर्क-वितर्क सुरू असतानाच स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी 10:00 वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सकाळी सभेचे आयोजन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आव्हानच एक प्रकारे मनसेकडून स्वीकारण्यात आले असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांच्या रविवारी होणाऱ्या सभेची घोषणा शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणूक आणि अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या जाहीर सभेचे नियोजन शनिवारी (21 मे) करण्यात आले होते. मात्र, दि. 5 जूनचा अयोध्या दौरा आणि मुंबई येथील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या सभेत उत्तर देतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे मुंबई परतले. त्यामुळे सभा रद्द झाल्याची तसेच विविध राजकीय वावड्या यातून उठल्या. विरोधकांकडून याचे भांडवल करण्यात आले तर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांवर टीकाही केली गेली. मात्र, आज राज ठाकरे यांच्या सभेची अधिकृत घोषणा मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
…म्हणून 10:00 वाजता सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका करीत आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो, त्यांनी कधी दुपारी सभा घेतली आहे का? असा सवाल केला होता. त्यामुळे पुणे येथे होणारी सभा 10:00 वाजता घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सभेच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.