पुणे – अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरवात झाली. मध्यवर्ती भागासह उपनगरात हलक्या तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभरात दोन तर पाषाण परिसरात तीन मिमी पावसाची नोंद झाली.
पुण्यात मागील चार दिवसांपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. ऐन पावसाळ्यात हवामानातील बदल आणि पश्चिमी वाऱ्यांमुळे घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली असून, गेल्या 24 तासात ताम्हिणी घाटात सर्वाधिक 220 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे.
ताम्हिणी घाटात 220 मिमी पाऊस
उन्हाच्या चटक्याने पुणेकर हैराण झाले होते. अशातच पुणेकर वरुणराजाची अतुरतेने वाट पाहात होते. गुरुवारी (दि. 21) पहाटेपासून शहरासह उपनगरात पावसाला सुरुवात झाल्याने हवेत गारवा पसरला. दिवसभर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पुणेकर सुखावले. मात्र, खरेदी आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केलेल्या भाविकांची सर येताच धांदल उडाली.
कोथरूड, वारजे, कात्रज, सिंहगड रोड, पुणे स्टेशन, येरवडा, पाषाण, औंध या भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढलेला होता. दरम्यान, शहरात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.