पुणे – देशाची सीमा पर्यायाने देश सुरक्षित राहावा यासाठी सीमेवर खडा पहारा देणाऱ्या भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांनी गुरुवारी “दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली. सुमारे तीनशेहून अधिक अधिकारी आणि जवान येथे उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील 330 कमांडचे जवान “दगडूशेठ’ गणपती चरणी नतमस्तक झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात जवानांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन, सुभेदार यांसह लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती झाली.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ पायमोडे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, राजू आखाडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
पुण्यात असलेल्या 24 मराठा बटालियन, 15 जाट बटालियन आणि एक महार बटालियनचे जवान आणि कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते. “गणपती बाप्पा मोरया…’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी सदर्न कमांडतर्फे ट्रस्टला सन्मानचिन्ह देण्यात आले.