जगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्‍वरमध्येच!

चेरापुंजी आणि मॉसिनरामपेक्षा जास्त पर्जन्यमान

मुंबई- भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या मेघालयातील चेरापुंजी-मॉसिनरामला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरने यावर्षी मागे टाकले असून आता हे हिल स्टेशन जगात सर्वाधिक पर्जन्यमान असलेले नवे ठिकाण ठरले आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे.

तर चेरापुंजीजवळच्या मॉसिनराम शहरात या कालावधीत 6,218.4 मिलिमीटरची नोंद झाली आहे, तर चेरापुंजी येथे 6,082.7 मिलिमीटरची नोंद झाली. हवामान खात्याने नुकतीच याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे.

तसेच पाटण तालुक्‍यातील पाथरपूंज येथेही तब्बल 7000 मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मेघालयातील खासी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मॉसिनराम येथे सर्वात उच्चांकी पाऊस पडतो. ही नोंद गिनेज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद आहे. तेथे मे ते ऑक्‍टोबरदरम्यान सर्वाधिक पाऊस होतो; परंतु यंदा महाबळेश्‍वरमध्ये झालेल्या पावसाने 300 इंच पावसाचा टप्पा पार केला आहे.

तेरा वर्षांनंतर म्हणजेच 2006 नंतर इतका विक्रमी पावसाची येथे नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद झाली होती.

सर्वाधिक पावसाची नोंद देशात चेरापुंजी येथे होत होती. मागील वर्षी चेरापुंजीला मागे टाकून जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मेघालयातील मॉसिनराम शहराची नोंद झाली. गेल्या वर्षी चेरापुंजी हे दोन नंबरला होते. कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर हे असे आगळंवेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होते. पावसाळी पर्यटनाचे मापदंड महाबळेश्वर शहराने बदलण्यास भाग पाडले असून, पावसाळ्यात सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दर वर्षी भर पडत आहे.

पडलेला पाऊस असा…

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार (एक जून ते चार सप्टेंबर)

महाबळेश्‍वर, सातारा : 7,631.1 मिलिमीटर.

पाथरपूंज, पाटण, जि. सातारा : 7,000 मिलिमीटर.

मॉसिनराम, मेघालय : 6,218.4 मिलिमीटर.

चेरापुंजी, मेघालय : 6082.7 मिलिमीटर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)