मावळातील ढगशेतीवर ढग दाटले

पीक काढणी लांबणीवर : अवकाळीमुळे “कहीं खुशी, कहीं गम’

मावळ – लांबलेला मान्सून आणि परतीच्या पावसाची “गर्जना’ मावळातील भातशेतीला संकटाच्या खाचरात अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हंगामातील समाधानकारक पावसाची नोंद असली तरी खाचरे बहरली.तरी बहुतेक ठिकाणची शेती अवकाळी फेऱ्यात सापडण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. वादळी वारासह कोसळणारा पाऊस ओंबीवर आलेल्या पिकांच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नाणे मावळ, पवन मावळ आणि आंदर मावळातील काही भागात भात काढणीसाठी आले आहेत.

ढगाळ वातावरणामुळे अगोदर लागवड झालेला शेतीला अवकाळीचा फटका बसण्याची शक्‍यता गडद झाली आहे. तालुक्‍यातील 15 हजार 647 हेक्‍टरपैकी 13 हजार 300 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यापैकी 12 हजार 464 हेक्‍टरवर भातपीक आहे. मावळात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे खरीप हंगाम जोरात आहे. भातपिकाबरोबरच अन्य कडधान्य पिकांची समाधानकारक वाढ आहे. पवना धरण क्षेत्रात आजअखेर 3901 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कामशेत :कामशेत परिसरातील भात पिके काढणीस आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कापणीयोग्य भात पिकांची कापणी करण्यास शेतकरी धजावत नाहीत. दरवर्षी मावळात दसऱ्यानंतर भात काढणीस शेतकरी सुरवात करत असतात. मात्र यावर्षी लांबलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कापणी योग्य आलेली भातपिके देखील नुकसानीच्या भीतीने शेतकरी भात पिके कापणीस तयार होत नाहीत.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वातावरणात झालेल्या बदलामुळे जोमात आलेल्या भात पिकांवर करपा, कडा करपा, तुडतुडे यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे रोगांपासून आपले पीक वाचविण्यासाठी पिकाची कापणी करून घेण्याच्या विचारात शेतकरी होते; मात्र ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिला आठवडा उलटून देखील पाऊस व ढगाळ वातावरण निवळले नाही. शेतकऱ्यांना पिकाची कापणी देखील करता येत नाही. भात पिकाची कापणी नाही, केली तर रोगांचा प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. कापणी केल्यास कापलेल्या पिकाचे पावसात भिजून नुकसान होईल. यामुळे “इकडे आड आणि तिकडे विहिर’, अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे.

आंदर मावळात लोंब्यांचा बहर –

टाकवे बुद्रुक -वरूण राजाने कृपादृष्टी दाखविल्याने मावळातील आंदर परिसरातील भाताचे पीक दमदार असून, भाताच्या ओंब्याचा बहर सुरू झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. यावर्षी मावळात भात पिकाचे भरघोस उत्पन्न मिळण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.

यावर्षी पावसाने वेळेवर आगमन करून शेतकरी वर्गासह सर्वांनाच दिलासा दिला होता. ऐन पावसाळी कालावधीत विश्रांती घेतल्याने भातबियाने पेरली भात खाचरे पावसाच्या प्रतीक्षेत होती. तर पाऊस कधी पडेल, या आशेने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता. या वर्षी पावसाने वेळेवर आगमन करून केले; मात्र आगमनानंतरच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन लांबले. गेल्या वर्षी देशातील काही राज्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती होती. यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता. यामुळे शेतकरीवर्गासह सर्वच क्षेत्रात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यात जुलै अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती.

गेल्या आठवडाभर मावळात पावसाने लावलेली दमदार हजेर आता मात्र थांबली आहे. हा पाऊस भातपिकासाठी पोषक असल्याने मावळातील भात पीक दमदार झाले आहे. आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे भात पोठरीवर आले असून, मावळातील पवन, आंदर व नाणे मावळ प्रांतात इंद्रायणी, पार्वती, सोनम, पवना तसेच कोकणातील काही जातीचे भात तयार होवून निसवले (लोंबीवर) आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.