राज्यात यंदा निश्‍चितच परिवर्तन

दिलीप वळसे पाटील : कारेगाव येथे मतदारांशी साधला संवाद

रांजणगाव गणपती – केंद्र व राज्याच्या निवडणुकीत मोठा फरक आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्‍नांवर होत असते. मागील पाच वर्षे एकही ठोस काम न करणाऱ्या सरकारला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत राज्यात निश्‍चितच परिवर्तन होणार आहे. आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील निवडणूक मागील सहा निवडणुकांप्रमाणेच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्याचा निश्‍चितच आनंद आहे, असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी प्रचारार्थ कारेगाव (ता. शिरूर) येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी आंबेगाव शिरूर-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा दूध संघाच्या संचालिका केशर पवार, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती सुनील तांबे, उद्योजक सदाशिव पवार, आंबेगाव शिरूर कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, उपसरपंच नवनाथ नवले, माजी सरपंच गुलाबराव नवले, पुष्पलता ओस्तवाल, राहुल गवारे, किसन जगताप, सयाजी नवले, मोहन नवले, सुनील ओस्तवाल, संदिप नवले, पृथ्वीराज नवले, दीपक कोहकडे, डॉ. आत्माराम गावडे, संतोष नवले, महेश कोहकडे,दिलीप ताठे, पोपटराव नवले, बापू फलके, बापू नवले यांसह महिला, नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये अपयशी सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणाऱ्या सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आणि शेतकरी व कष्टकरी यांचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शहाजी तळेकर यांनी स्वागत केले तर ऍड. हिरामण गावडे यांनी आभार मानले.

“मताधिक्‍क्‍य देण्यासाठी जीवाचे रान करणार’
राज्यात जातीयवादी व धर्मांध शक्‍तींना विरोध म्हणून जनता दल (से.) पक्षाने महाआघाडीला पाठिंबा दिला आहे. आंबेगावमधून मी माझी उमेदवारी मागे घेत वळसे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत त्यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून देण्यासाठी आपण जिवाचे रान करणार, अशी ग्वाही युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील 39 गावांत दिलीप वळसे पाटील यांनी विविध विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. वेळ नदीवरील बंधाऱ्यामुळे या भागातील शेती हिरवीगार झाली आहे. विकासकामे करणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय 39 गावांतील जनतेने घेतला आहे. उमेदवार वळसे पाटील यांना 39 गावांतून गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य देण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
– स्वाती पाचुंदकर, सदस्या, जिल्हा परिषद

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.