पुणे : रेल्वे तिकीट तपासणीसांचे (टीसी) काम आता ऑनालइन होणार आहे. या अंतर्गत रेल्वेच्या पुणे विभागाला 96 टॅब देण्यात आले आहेत. यात मध्यरेल्वेकडून या टॅबद्वारे 13 ट्रेन्समध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात येणार आहे. यातील पुणे विभागातील दोन गाड्यांमध्ये गुरूवारपासून (दि. 30) चाचणी होणार आहे. आता ऑनलाइनरित्याच टीसींचे कामकाज चालणार आहे. यामुळे टीसींच्या हातात नेहमी असणारे कागदाचे ओझे आता कायमचे कमी होणार आहे. त्यामुळे टीसींना मोठा दिलासा मिळणार आहे. कागदविरहित (पेपरलेस) कामकाज होण्यासाठी आणि पारंपारिक पद्धतीने सुरू असलेले कामकाज बदलत्या काळाप्रमाणे ऑनलाइन करण्यासाठी रेल्वेकडून टॅब वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे बरीचे कामे वेगाने होतील.
असा होणार उपयोग
रेल्वे स्थानकात गेल्यानंतर टीसीच्या हाती नेहमीच प्रवाशांच्या बुकिंगची कागदपत्रे दिसतात. याद्वारे टीसी तिकीट चेक करण्यास बराच वेळ लागत होता. जागा रिक्त असेल, तर त्याची माहिती अद्ययावत करण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना त्या जागा देण्यास अडचणी येत होत्या. आता टॅबमुळे हे काम ऑनलाइन होणार असून, टीसींना कागदपत्रे सांभाळण्याची गरज राहणार नाही. पर्यायाने कागदांचा खर्चही बचत होईल.